Saturday, 15 May 2021

चांगले की वाईट ??

पूर्वी टीव्ही हे मनोरंजनाचे एकमेव साधन होते
ज्यावर चित्रपट,मालिका,गाणी पाहणे आवडायचे.
पण गेल्या १५/२० वर्षात टीव्ही ने खूप मोठी क्रांती केली आहे,
आजच्या घडीला टीव्ही चे हजारो चॅनेल आहेत.
लहान मुलांसाठी चॅनेल,खेळांसाठी चॅनेल,सिनेमांसाठी चॅनेल तर गाण्यांसाठी ही चॅनेल.
असो..मुद्दा हा की हल्ली टीव्ही पाहणे सर्वांना कितपत रुचते ??.
बातम्यांचे चॅनेलंच बघा ना,बातम्या बघायच्या म्हंटल की,
निवेदक नुसतेच जोरजोरात बोंबलताना दिसतात,त्यांना शांत राहून व्यवस्थित बातम्या सांगताच येत नाही.
बातम्या सांगताना असे काही सांगतात की,
प्रेक्षकांना माहिती देतात की घाबरवतात हेच कळत नाही.
हीच अवस्था गाण्यांच्या चॅनेल ची,कुठलेही हिंदी गाण्यांचे चॅनेल लावा,
त्यात हिंदी कमी आणि इंग्रजी,पंजाबी भाषेचाच वापर जास्त असतो.
मुख्य म्हणजे गाण्यांचे चित्रीकरण ही असे असते की त्यांना नक्की काय दाखवायचे आहे हेच कळत नाही.
आता मुख्य बाबी वर येऊ ते चॅनेल जे कुटुंब एकत्र बसून बघतील असे,
पण खरचं हल्ली असे चॅनेल आहेत का जे आपण कुटुंब एकत्र बसून बघू शकतो,किंवा त्या चॅनेल मधून काही बोध घेऊ शकतो.
हल्ली कुठलेही असे चॅनेल लावा प्रत्येक चॅनेल वर बहुतेक मालिकांमध्ये विवाह बाह्य संबंधावर आधारित मालिकाच दाखवल्या जातात.
आपले मराठी चॅनेल ही ह्या बाबतीत मागे नाहीयेत,झी मराठी असो किंवा स्टार प्रवाह नाहीतर इतर कुठले चॅनेल असो प्रत्येक चॅनेल मधील काही मालिकांमध्ये नात्यांचे धिंडवडे काढले जातात.
प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं.
कित्येक मालिकांवर विवाहबाह्य संबंध ह्या विषयांवरच जास्त भर दिला जातो.
अहो मुलांचे लग्न दाखवायचे असताना त्यांच्या आई वडिलांचे नको त्या अनैतिक संबंधाचे विषय जास्त दाखवले जातात.
अशा ह्या मालिका बघताना लहान पण जाणते असे घरातील मुलं/मुली ही ह्या मालिका बघत असतात.
अशा प्रकारच्या मालिका बघताना त्यांचे मन त्यांची बुद्धी ह्या मालिकेतून नक्की काय आत्मसात करत असतील हा प्रश्न ही वेगळाच.
मालिका बनवणारे सरळ सरळ बोलतात आम्ही समाजात घडणारे किस्से मालिकेत मांडतो,
मांडा ना पण मालिका बघताना कुटुंबे च्या कुटुंबे एकत्र बसतात ह्याचे ही भान ठेवा आणि त्या अनुषंगाने वाईट कमी आणि चांगलं दाखविण्याच्या जास्त प्रयत्न करा.
सिनेमांमध्ये ही असच चालत असतं, हिंसात्मक दृश्ये बघताना तर अंगावर काटा येतो.
अशा प्रकारची दृश्ये बघून समाजातील काही गुंड प्रवृत्ती चे लोक अशा भयंकर दृश्यांचे रिअल लाईफ मध्ये आकलन करतात.
त्यांना रीळ आणि रिअल लाईफ मधला फरकच कळत नाही,
अहो सिनेमात सर्व काही खोटं खोटं दाखवलं जातं तसा अभिनय करण्याचे त्यांना पैसे मिळतात.
पण खऱ्या आयुष्याचं काय ? एखाद्याचा जीव जातो हो हकनाक बळी जातो,साधी पिन जरी टोचली तरी माणूस लगेच तळमळतो आणि हे सिनेमावाले नको नको तशी दृश्ये दाखवितात.

3 comments: