Monday, 22 November 2021

असे कसे हे वागणे ??

खूप दिवसांनी आज लिहायला वेळ मिळाला कारण विषयच तसा मिळाला.
घटना थोडक्यात सांगायची म्हणजे,एका मुलाचा मोबाईल त्या दिवशी त्याच्या वडीलांकडे होता त्यांनी तो एका कार्यक्रमाला गेल्यावर तिथे फोटो काढावे म्हणून घेतला होता.
कार्यक्रमात बरीच मंडळी जमली होती,छान गप्पा चालू होत्या कारण खूप दिवसांनी कदाचित 3/4 वर्षांनी ही मंडळी एकत्र आली होती.
ह्या गप्पा चालू असताना अचानक एक कॉल आला,म्हणून भाऊंनी कॉल रिसीव केला आणि क्षणार्धात आवाज चढवत समोरच्याला कोण बोलतोस तू ? नाव काय तुझं ? आई बापाने हेच शिकवलं का ? कॉलेज ला हेच शिकता का ? म्हणत खूप झाडत घेतलं.
आम्ही सर्व हैराण नक्की काय झालं असं काय घडलं की भाऊ इतका चिडला.आम्ही विचारलं भाऊला काय झालं ते पण भाऊचा पारा जरा जास्तच चढला होता,भाऊंची ओरड चालू असताना समोरच्याने लगेच कॉल कट केला,भाऊंनी पुन्हा कॉल केला तर मोबाईल स्विच ऑफ केला गेलेला.
मग काय भाऊंनी घरी कॉल केला आणि मुलाला ओरडले,हे असे कसे मित्र तुझे ? हे असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे.असे ओरडत असताना उद्या परत आल्यावर मी कॉलेज ला पण येईल आणि कोण तो मुलगा आहे ते पण बघेल.
हे इतकं सगळं लिहिण्याचे कारण की हल्ली मुलांमध्ये एकमेकांशी संवाद साधण्याची बदललेली पद्धत.
ही पद्धत कुठून आली कशी आली ह्याचा शोध लागणे कठीण आहे परंतु ही पद्धत खूपच घाणेरडी खूपच वाईट आहे ह्या अशा प्रकारच्या वागण्याला वेळीच बंधन घालायला हवे.
हल्ली ज्याला बघावे तो आपल्या मित्राला हाक मारताना आपल्या शरीरावर असलेल्या कित्येक अवयवांच्या नावाने हाक मारतात महत्वाचे म्हणजे ह्यांना असे वागताना अशा प्रकारे फालतू नावाने हाक मारताना खूप मोठं पराक्रम गाजवल्यासारखा आनंद वाटतो.
विचार करा एखाद्या व्यक्तीने त्याच्या मुलाला आलेला कॉल रिसीव केला आणि समोरच्याने जर,
का रे ये आ× झ×× उद्या कॉलेज ला येणार की नाही ?
असा प्रश्न ऐकला तर त्या व्यक्तीला काय वाटेल.
अशा ह्या घाणेरड्या शिव्यांनी,घाणेरड्या शब्दांनी एकमेकांना हाक मारायची पद्धत हल्लीच्या 10/12 वर्षांच्या लहान मुलांमध्ये पण आहे.
खूप वाईट वाटतं की आमच्या शहरात हे प्रमाण जरा जास्तच आहे,बाजारात फिरताना,बस प्रवास करताना,रिक्षा स्टँड वर उभे असताना किंवा सहज चौकात जरी उभे राहिलो तरी कानांवर ह्यांचे हे फालतू घाणेरडे संभाषण ऐकायला मिळते.
अशा ह्या घाणेरड्या वागण्याला नक्की जबाबदार कुणाला धरावे ? घरच्यांना जे मुलांकडे नीट लक्ष देत नाहीत की फालतू मित्रांना जे आपल्या मित्राला चांगल्या स्वभावाचा राहू देत नाहीत.